Thursday, October 20, 2016

      आजकाल अतिशय प्रसिद्ध असलेल्या गणपती या देवतेची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय असावी असा प्रश्न मला सातत्याने पडत आलेला आहे. जसा मानव समाज पूर्वी होता तसा राहिलेला नाही, तसेच त्या समाजाची दैवतेदेखील पूर्वी होती तशी राहिलेली नाहीत; हे मला ठाऊक होते. गणपतीच्या बाबतीत हे जरा जास्त उठून दिसते. आजकाल आधुनिक खंडोबा म्हणजे जय मल्हार रूपातील गणपती इतकेच काय तर बाहुबलीच्या रूपातील गणपती आपल्याला पाहायला मिळतो. अशाच थोड्याशा वेगळ्या म्हणजे तोंड हत्तीचे परंतु शरीर माणसाचे अशा देवाचा कधीपासून कसाकसा विकास होत गेला याचा घेतलेला हा शोध. 
गणपति : हत्तीचे शिर कि, गणाधिपती?
            आज गणपती म्हटले की, हत्तीचे डोके असणारी देवता असे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. मात्र पूर्वी हे असेच होते का? गणपतीचा उल्लेख ऋग्वेदात येतो, मात्र तो स्वतंत्र देवता म्हणून नाही तर, ब्रह्मणस्पतीला उद्देशून ते विशेषण आलेले आहे, असे भारतीय संस्कृतिकोशाने नोंदविले आहे. गणांनां त्वा गणपति हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् I” [1] "गणांचा तू (अधिपती) गणपति..... " असे विशेषण ब्रह्मणस्पतीला लावल्याचे दिसून येते. तर ऋग्वेदातच दहाव्या मंडलात 'गणपति' हे विशेषण इंद्राला लावल्याचे दिसून येते. त्यामुळे त्याकाळी गणाचा प्रमुख अशा मर्यादित अर्थानेच गणपति हा शब्द वापरल्याचे दिसून येते. गणपतीला उद्देशून जी काही इतर नावे आहेत त्या बहुतेकांचा अर्थ देखील गणाचा किंवा लोकांचा प्रमुख असाच होतो. मग अशा पदाचा गणपती या हस्तिमुखी देवात कधी रूपांतर झाले या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळवायला हवे. 
गणपति : विघ्नकर्ता कि विघ्नहर्ता? 
            आज आपण ज्याला विघ्नहर्ता म्हणतो तो गणपती साधारणतः इसवी सनाच्या चौथ्या पाचव्या शतकापूर्वी तसा नव्हता. तर गणपती त्यावेळी विघ्नकर्ता मानला जात होता, स. रा. गाडगीळ सांगतात की, "या काळातील गणपती एक नसून तो अनेकांचा समूह आहे. या गणपतींनी पछाडलेला माणूस वेडा होतो; त्याला भयानक स्वप्ने पडू लागतात; गुणसंपन्न राजांनाही राज्याचा अधिकार मिळत नाही; कुमारिकांना पती मिळत नाही; विवाहीत स्त्रियांना संतती होत नाही; झालेली संतती मृत्युमुखी पडते; विद्वान ब्राह्मण गुरूला विद्यार्थी मिळत नाहीत. थोडक्यात गणपती हा मूर्तीमान विघ्नच होय."[2] तर रा. चिं. ढेरे सांगतात, “विनायक हे गणपतीचे आणखी एक नाव आहे. याज्ञवल्क्यस्मृति सांगते, रुद्र आणि ब्रह्मा यांनी विनायकाला कर्म-विघ्नासाठी नियूक्त करून, त्याला गणांचे अधिपत्य दिले त्याने पछाडलेल्या माणसाची लक्षणे जाणून घे; विनायकाने पछाडलेला माणूस स्वप्नात असे पाहतो की, आपण पाण्यातून वाहत आहोत. तसेच त्याला स्वप्नात मुंडित आणि काषायवस्त्रधारी व्यक्ती दिसतात. आपण कच्चे मांस खाणाऱ्या प्राण्यांवर आरोहण केले आहे. आपण रस्त्याने जात असून आपल्यामागून कोणी परके(शत्रू) येत आहे, असेही दृश्य त्याला स्वप्नात दिसते. विनायकाच्या पीडेमुळे राजपुत्राला राज्य मिळत नाही; कुमारीला पती मिळत नाही ; स्त्रीला अपत्य लाभ होत नाही; श्रोत्रियाला आचार्यत्व आणि शिष्याला अध्ययन लाभत नाही; तसेच व्यापाऱ्याला लाभ आणि शेतकऱ्याला पीक मिळत नाही."[3] तर अशा या विघ्नकर्त्या गणपतीचा विघ्नहर्ता असा बदल कधी झाला? या प्रश्नाचे उत्तर देखील मिळवायचे आहे. 
विविध मते 
            गणपतीच्या बाबत वेगवेगळ्या अभ्यासकांची वेगवेगळी मते आहेत. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मते,[4] "गणपती किंवा गणेश ही विशेषणे मुळात रुद्र-शिवाची असावीत. शिवाला वायुपुराणात 'लंबोदर' 'गजेंद्रकर्ण' अशी विशेषणे लावली आहेत. गणपती हा शिवपुत्र होय, अशा कल्पनेचे हे मूळचे बीज होय." तर पुढे ते गणपतीच्या देव बनण्याच्या प्रक्रियेबद्दल सांगतात कि, "आर्य व आर्येतरांची संस्कृती एकात्म बनू लागण्याच्या काळात, इसवी सनाच्या प्रारंभीच्या शतकांमध्ये, गणपती हा देव आर्येतरांच्या इतर देवतांबरोबर, आर्यांनी स्वीकारला असावा. गजाचे मुख असलेल्या या देवतेच्या अगदी प्राचीन अशा मूर्ती गुप्तकालीन आहेत तत्पूर्वीच्या नाहीत;...."गणपतीच्या मूळाबाबत ते सांगतात कि, "आर्येतरांची गणपती हि हनुमानाप्रमाणे ग्रामदेवता असावी. गणपती, हनुमान, देवी, वेताळ, आसरा(ऱ्या) इ. देवतांना शेंदूर फासतात." गुप्तकाल हा या देवतेचा पहिला उत्कर्ष बिंदू होय असे ते मांडतात. अशाच प्रकारची मते भारतीय संस्कृतिकोशाने देखील नोंदवली आहेत. प्रो. फौचर यांना उद्धृत करून, "काही आर्येतर गण किंवा समूह हत्तीची पूजा करीत आणि त्या पूजेतूनच गणेशपूजा विकास पावली त्यांच्या मते गणेश हि प्रथम आर्येतरांची एक ग्रामदेवता होती...... ...... तिच्यापुढे नरबळी देऊन त्या रक्ताचा तिच्यावर अभिषेक करीत असतील, अशीही शक्यता आहे."[5] असे मत मांडलेले आढळते. लक्ष्मणशास्त्री जोशी मात्र हत्ती हा शाकाहारी प्राणी असल्याने रक्ताभिषेक होत नसावा असे मांडतात.[6] जसे हे विद्वान हि मते मांडतात, त्यांच्यापेक्षा वेगळी मते रा. चिं. ढेरे यांनी मांडलेली आढळतात.[7] त्यांच्यामते गजमुख गणेशाची प्राचीनता वेदकाळाइतकी मागे निश्चित जाते. त्यासाठी ते 'दि प्रॉब्लेम ऑफ गणपती' या पुस्तकाच्या प्रस्तावनेला उद्धृत करून लुरिस्तान (पश्चिम इराण) येथे उत्खननात मिळालेल्या शिल्पफलकावर हस्तीमुखी देव कोरलेला आहे आणि वॅडेलबर्घ यांच्या मतानुसार त्याचा काळ इ. स. पूर्व 1200 ते 1000 हा असावा असे मांडतात. तर डॉ. म. के. ढवळीकर यांना उद्धृत करून ते "आर्यांच्या एखाद्या प्रबळ जमातीचे हे(गणपती) दैवत वायव्येकडून प्रथम उत्तर भारतात आणि नंतर उर्वरित सर्व भारतात क्रमाने लोकप्रिय होत गेले असावे" असे मांडतात. त्यासाठी पिलुसार या अफगाणिस्तानातील कपिशानगरीतील हस्तीमुखी दैवताचा हवाला देतात. "इसवी सनाच्या सातव्या शतकातील पिलुसार या हस्तीमुखी दैवताची हि प्रसिद्धी लक्षात घेता हा तेथील पुरातन देव असला पाहिजे." अशाप्रकारे गणपती ही आर्य देवता होती अशी मांडणी करणारे माझ्या अभ्यासात आलेले रा. चिं. ढेरे हे एकमेव अभ्यासक आहेत. तर याहीपेक्षा वेगळी मांडणी करणारे देवीप्रसाद चटोपाध्याय हे होत. ते मार्क्सवादी पंडित आहेत. त्यांच्या मते, “गणपती हा लोकायतिकांशी संबंधित असावा. त्यामुळेच ब्राह्मणी स्मृतिकारांनी गणपतिनिंदा केली असावी. मात्र गणावस्थेतून राज्यावस्थेकडे जात असताना हत्ती हे टोटेम(कुललक्षणचिन्ह) असणाऱ्या एका मोठ्या गणाने राज्यावस्था स्वीकारली असावी. आणि स्मृतिकार हे राज्यसत्तेचे कडवे पुरस्कर्ते असतात त्यामुळे त्यांनी या घटनेनंतर गणपतीची निंदा बंद करून गणपतीला मान देण्याचे सुरु केले असावे.”[8] अर्थात त्यांच्यामते देखील गणपती हा हस्तीमुखी देव म्हणून इसवी सनाच्या चौथ्या पाचव्या शतकाच्या पूर्वी पूजला जात नसावा. "The selection of one definite Ganpati from a previous multiplicity of them and the transformation of his nature as well as the attitude expressed towards him, could not be accidental. These demand an explanation. And the only working hypothesis to explain it is that all these were the reflection of the process by which some tribe, originally bearing the banner of the elephant, eventually established its superiority as a victorious state. The old veneration felt by this tribe for its totem was retained, but its nature changed. The totem became a god only the name remained."[9]
याहीपेक्षा गणपतीचे शिर हत्तीचे होण्याच्या प्रक्रियेचे एक वेगळे स्पष्टीकरण पं. सातवळेकर यांनी दिलेले आहे. त्यांच्या मते, "शिव हा फार प्राचीन काळी भूतान देशाचा प्रबळ राजा होता. भूत जमातीच्या लोकांचे वसतिस्थान ते भूतान होय. आजही भूतानात भूत जमात अस्तित्वात आहे. कैलास ही शिवाची राजधानी होती या भूतानात सणावाराच्या दिवशी लोक निरनिराळे मुखवटे घालून मिरवतात. हे मुखवटे पशु-पक्षी व अक्राळ-विक्राळ प्राणी यांचे असतात यात हत्तीचा मुखवटा घालून मिरवणारे लोकही होते त्यांच्या या पद्धतीतूनच पुढे त्यांच्या गणपतीला गजमुख प्राप्त झाले."[10] ही सर्व विवेचने पाहिल्यानंतर आपण काय स्वीकारावे? असा प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी या सर्व मतांची चिकित्सा करणे गरजेचे आहे.
गाळून घेताना..
            तर्कतीर्थ सांगतात की, आर्यांनी आर्येतरांचा देव स्वीकारला असावा मात्र या प्रक्रियेचे कारण मात्र ते देत नाहीत. त्यांच्या गणपती ही आर्येतर देवता आहे या मताला मात्र भक्कम पुरावे उपलब्ध आहेत. मात्र या मताला छेद देणारे मत रा. चिं. ढेरे यांचे आहे. त्यांच्या मते गजमुखी गणेशाची प्राचीनता वेदकाळाइतकी मागे जाते. मात्र याला भक्कम आधार नाही. खुद्द ऋग्वेदात गणपती ही स्वतंत्र देवता नाही. तर ते इंद्र आणि ब्रह्मणस्पतीला दिलेले विशेषण आहे. अथर्ववेदात येणारे गणपत्यथर्वशीर्ष हे वेदसंहितेशी साक्षात संबंधित नाही असे ते स्वतःच मांडतात. त्याहीपुढे ते ज्या हस्तीमुखी देवतेच्या शिल्पफलकाची मांडणी करतात त्यात हत्तीचे शिर असणारे पुरुष हे दोन्ही बाजूस उभे आहेत तर मध्ये स्त्रीदेवता त्यामुळे ते गणपतीच्या प्राचीनतेचा पुरावा होऊ शकत नाही. तसेच पिलासुर हा देव देखील सातव्या शतकात प्रसिद्धी पावला असला तरी त्याचा अर्थ तो वेदकालीन असावा असा होत नाही. ते जे ढवळीकरांना उद्धृत करून मांडतात कि, गणपती हि आर्य देवता असावी हे मत देखील टिकत नाही कारण वैदिक ग्रंथ व ब्राह्मण ग्रंथ यात कोठेच गणपतीचा उल्लेख(देवता म्हणून) सापडत नाही. त्यामुळे रा. चिं. ढेरेंची मांडणी नाकारावी लागते. 
            चटोपाध्यायांची मांडणी मात्र चिंतनीय आहे. गणपती हा लोकायतिकांशी संबंधित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात गणपतीला व्रात्य आणि शूद्रांचा देव संबोधला गेल्याचे पुरावे आहेत मात्र त्यांच्या गणपतीच्या विघ्नकर्त्याच्या विघ्नहर्ता बनण्याच्या प्रक्रियेच्या मांडणीला पुरेसे भक्कम आधार नाहीत. स्मृतिकार हे राजसत्तेचे कडवे समर्थक असतात. हे त्यांनी धरलेले गृहितकच आहे. तसेच गणव्यवस्था ही वर्गविहीन असते हे देखील गृहितकच आहे. वास्तविक स्मृतिकारांना राज्यावस्थेमुळे कोणता फायदा होणार होता? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. गणपतिनिंदा ही जर सांस्कृतिक पातळीवर असेल तर राजकीय बदलामुळे तिचे स्वरूप कसे बदलेल? हाही प्रश्न आहेच. पं. सातवळेकरांचा तर्कदेखील चांगला आहे मात्र मला तरी त्यासाठीचे पुरावे आढळले नाहीत मात्र शिवगणाकडे ते करत असलेला अंगुलीनिर्देश ध्यानात घेण्यासारखा आहे.
निष्कर्षाप्रत
            या सगळ्या लोकांची मते पाहिल्यानंतर मला या सगळ्यातून झालेले आकलन व माझी मते मी मांडतो. एका प्राचीन काळी हत्ती हे टोटेम असणारे किंवा हस्तिपूजक लोक एका प्रदेशात राहात असावेत.(गांधार आणि त्याभोवतीचा भाग हा हस्तिपूजकांचा होता.[11]) हे आर्येतर गणजीवी लोक असावेत. हे लोकायतिकांशी संबंधित अर्थात अवैदिक असावेत. गणपतीचा सातत्याने शिवाशी येणारा संबंध हा गणपती हे दैवत राक्षस गणाशी संबंधित असले पाहिजे हेच सांगतो. तर या आर्येतर अवैदिक लोकांची यज्ञविरोधी भूमिका आपण जाणतोच त्यामुळे आर्यांच्या यज्ञात विघ्ने आणणारे किंवा वैदिक कर्मकांडाना विरोध करणारे हे अवैदिक गणांचे प्रमुख गणपती किंवा विनायक हे स्मृतिकारांच्या वृष्टीने विघ्नकर्ते असणे साहजिकच आहे. या दृष्टीने काही संदर्भ देणे मला आवश्यक वाटते. रा. चिं. ढेरे यांनी ‘लोकदैवतांचे विश्व’ या पुस्तकात ‘ज्येष्ठा आणि ज्येष्ठराज’ या लेखात अलक्ष्मी आणि गणेशाचे संबंध उलगडून दाखवले आहेत. अलक्ष्मी अर्थात निऋती हि वैदिक परंपरेच्या विरोधातील आहे. हे तर प्रसिद्ध आहेच. त्यामळे गणपती अथवा गणेश ही असाच अवैदिक देव असावा. आपण मागे जी गणपती बाधा उल्लेखली होती ती दूर करण्यासाठी जो बलिविधी सांगितला आहे त्या विधीच्या प्रसंगी ज्या देवांना आवाहन करायला सांगितले आहे त्यात यज्ञविक्षेपी हा देखील एक देव आहे हे लक्षणीय आहे. तर अशा अवैदिक गणपतीला वैदिकांनी कधी स्वीकारले असावे? तर यासाठी डॉ. सुमंत मुरंजन यांच्या मांडणीकडे लक्ष द्यावे लागेल. ते मांडतात, "इ. स. पू. 600 म्हणजे बुद्धपूर्व उपनिषदे अवतीर्ण झाल्यापासून तो इ. स. पू. 200 पर्यंत ब्राह्मणांचे सामाजिक प्रस्थ आणि त्याच्या समवेत त्यांच्या उपजीविकेची साधने दोन्हीही लयास जाऊ लागली होती."[12] पुढे ते मांडतात, "इ. सनाच्या प्रारंभी व नंतर अनेक शतके भारताच्या वेशीबाहेर कित्येक परकीय जमाती स्थायिक असत. विचारांत, आचारांत, संस्कृतीत, राहणीत त्यांचे भारतीय जनतेशी विशेष साम्य असेल असे वाटत नाही. खुद्द ब्राह्मण पुरोहित त्यांस वेदबाह्य असेच समजत. परंतु परिस्थिती पुरोहितांच्या दैनंदिन उपजीविकेवरच बेतल्यावर त्यांनी आपला मोर्चा या अवैदिक वर्णविहीन जमातींकडे वळवला. कित्येक शतके महत्प्रयास करून या अनेक पाखंडांना वैष्णव व शैव पंथांचे स्वरूप दिले, त्यांच्यात नसलेला वर्णभेद उत्पन्न केला आणि त्यांचे पुरोहित म्हणून आपली उपजीविका पुनःश्च सिद्ध केली."[13] सुमंत मुरंजन यांचे हे मत विचार्हार्य आहे. प्रतिक्रांतीच्या काळात गणपतीचे वैदिकीकरण केले गेले असण्याची शक्यता आहे. माझ्या दृष्टीने हाच उत्तम तर्क आहे, जो गणपतीच्या विघ्नकर्त्याच्या विघ्नहर्ता बनण्याच्या प्रक्रियेचे विश्लेषण करू शकतो. गणपतीचे वैदिकीकरण झाल्यानंतर गणपती हा पुरोहितांची मक्तेदारी बनत गेला. त्यानंतर कित्येक शतकानंतर त्याच्या विरुद्ध क्रांतीबा फुलेंनी एक अखंड लिहून टीका केली आहे. फुले हे ब्राह्मण्यवादाविरुद्धचे मोठे बंडकरी होते. ते लिहितात, "अंत्यजासी दूर, भटा लाडू देतो II नाकाने सोलीतो II कांदे गणू II2II .......... गणोबाची पूजा भावीका दाविती II हरामाच्या खाती II तूप पोळ्या II8II"[14] अशाप्रकारे गणपतीच्या आडून होणाऱ्या शोषणावर त्यांनी हल्ला केला. तर भाऊसाहेब रंगारी** यांनी घरातील गणपती सार्वजनिक केला. ऐक्याची वृद्धी होण्यासाठी गणेशोत्सवाचा उपाय राबवला. 
वर्तमानात परत येताना
गणपतीचा इतिहासात शोध घेऊन झाल्यानंतर वर्तमानात गणपतीचे व गणेशोत्सवाचे काय करावे? भाविकांना उपासना करण्याची बंदी कधीच नसते मात्र आपण देवाची उपासना करत असताना निसर्गाचे आणि पर्यायाने आपलेच किती नुकसान करत आहोत हेही ध्यानात घ्यायला हवे व प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मुर्त्या टाळून पर्यावरणपूरक गणेशोत्सव करावा. शक्यतो सगळे कर्मकांड टाळावे, देवाच्या आणि आपल्या मध्ये कुठला दलाल लागू नये याची दक्षता घ्यावी. हाच इत्यर्थ...         

संदर्भ
1] ऋग्वेद (२-२३.१)[भारतीय संस्कृतिकोश]
2] लोकायत, गाडगीळ स. रा. , पा. क्र. 48
3] लोकदैवतांचे विश्व, ढेरे रा. चिं. , पा. क्र. 34
4] विश्वकोश, नोंद- गणपति, जोशी लक्ष्मणशास्त्री 
5] भारतीय संस्कृतिकोश, नोंद- गणपती 
6] पूर्वोक्त, विश्वकोश नोंद
7] पूर्वोक्त, लोकदैवतांचे विश्व
8] Lokayata: A study in ancient Indian materialism, Chattopadhyay Debiprasad
9] पूर्वोक्त, Lokayata: A study in ancient Indian materialism (chapter 3)
10] पूर्वोक्त, भारतीय संस्कृतिकोश नोंद
11] पूर्वोक्त, लोकायत, गाडगीळ स. रा.
12] पुरोहित वर्गवर्चस्व व भारताचा सामाजिक इतिहास, मुरंजन सुमंत
13] पूर्वोक्त, पुरोहित वर्गवर्चस्व व भारताचा सामाजिक इतिहास
14] महात्मा फुले समग्र वाड्मय, पा. क्र. 589

**येथे बदल केला आहे.
                                                                                                                                                                    -मयूर खराडे